ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतमध्ये बायोमट्रिक मशिनवर हजेरी सक्तीची करा. सामाजिक कार्यकर्ता भीमसेन उबाळे यांची गटविकास आधिकारी यांचेकडे मागणी.


पुणेरी पहाट वृत्तसेवा ,इंदापूर:- प्रतिनिधी-सलीम शेख- आपल्या इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये सरपंचाप्रमाणे ग्रामसेवक हे पदही महत्त्वाचे आहे; पण ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आपल्याला दिलेल्या वेळात हजर राहत नसल्याने ग्रामस्थांची ग्रामपंचायतीमधील कामे प्रलंबित राहतात, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी बऱ्याच वेळा ग्रामपंचायत कार्यालयात भेटत नाही. ग्रामसेवक गावात येत नाही, भेटत नाही अशी मोठी ओरड ग्रामीण भागातील नागरिकांची होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होते. कित्तेक वेळेला ग्रामसेवक हे आपल्या खासगी कामाकरीता इतरत्र फिरत असतात किंवा घरीच असतात व ग्रामस्थांनी फोनवर संपर्क केला असता मी पंचायत समितीमध्ये आहे तसेच मिटींगमध्ये आहे अशा प्रकारची ठरलेली कारणे सांगीतली जातात.त्यामुळे ग्रामस्थांची कामे वेळेवर होत नाही. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना व मजुर वर्गाला बसतो. ग्रामसेवकासह ग्रामविकास अधिकारी, (तलाठी, कृषी सहायक, आरोग्य खात्यातील कर्मचारी, पशुवैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी) वेळेत कधीच उपस्थित नसल्याचे याबाबत काही सामाजिक कार्यकर्ते, संघटना यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन ग्रामसेवक, तलाठी यांच्यासाठी बायोमेट्रीक हजेरी सक्तीची करावी, अशी मागणी केली होती.त्यानंतर शासनाने याबाबत निर्णय घेतला असून, त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. त्या आदेशाप्रमाणे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू झाल्याने कामचुकारपणा करणाऱ्या ग्रामसेवकांना चांगलाच चाप बसणार आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने तसे आदेश जिल्हा परिषद स्तरावर दिले आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी आपल्या कार्यक्षेत्रातील इंदापूर तालुक्यामधील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तंतोतंत व्हावी व इंदापूर तालुक्यातील ग्रामस्थांना योग्य तो न्याय आपल्या आदेशाने मिळावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता भिमसेन उबाळे यांनी पत्राद्वारे इंदापूर पंचायत समितीचे गटविकास आधिकारी यांचेकडे केली आहे .बायोमेट्रीक हजेरी सक्तीची केल्यास ग्रामविकासाला होणार हे फायदे ही त्यांनी यामध्ये नमूद केलेले आहेत   :-१) बायोमेट्रीक हजेरी सक्तीची केल्यास ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना गावात येणे सक्तीचे राहणार आहे.२) हजेरीसाठी गावात आल्यावर, ग्रामपंचायतींत उपस्थिती वाढणार. पर्यायाने ग्रामस्थांची कामे वेगाने होणार.३) ग्रामपंचायत कार्यालय केव्हाही उघडते व केव्हाही बंद केले जाते. कधी कधी तर, ग्रामसेवक नाहीत, या सबबीखाली कार्यालयउघडलेच जात नाही. मात्र आता हे प्रकार बंद होतील. ४) वरच्या साहेबांनी बोलावले आहे,’ असे सांगून ग्रामसेवक निघून जातात, गावाच्या जिल्हा परिषदेत जायचे आहे, पंचायत समितीत काम आहे अशी ग्रामसेवकांची खोटी कारणे बंद होऊन ग्रामस्थांची कामे होतील.५) ग्रामसेवकांच्या हजेरीने ग्रामविकासाला चालना मिळण्यास मदत होईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *