हडपसर व शेजारील परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य…!


पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे ); हडपसर परिसरातील ससाणे नगर पासून ते महंमदवाडी पर्यंत – डी मार्ट, कोरिएंथन क्लब, वेताळबाबा मंदिर, रहेजा चौक, परिसरातील खड्ड्यांमुळे मुळे रस्त्यात दुचाकी कोलमडून अपघात होत आहेत, तरीही पालिका प्रशासन खड्डे भरण्यात कमी पडत आहे रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी मुहूर्त शोधत आहे का ?, असा संतप्त सवाल वाहनचालक् आणि स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला आहे.पावसामुळे पडलेल्या खड्डेमय रस्त्यातून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांत वाहने आदळल्याने वाहनांचे नुकसान होत आहे, तर कंबर, पाठ आणि मणक्याचा त्रास होत असल्याचे चालक, सहप्रवाशांनी सांगितले. पीएमपी बस खड्ड्यात आदळताच चाकरमानी, शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची तारांबळ उडत आहे. आता पावसाने उघडीप दिली आहे, त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी महंदवाडीतील बाळा घुले, दिलीप राठोड, ओंकार तिवारी यांनी केली. गृहिणी पूनम देशपांडे, अनसुया गुप्ता म्हणाल्या की, पावसाची रिपरिप, खड्डे-चिखलमय रस्त्याने ये-जा करताना नको झाले आहे. वाहने खड्डयात गेली की, अंगावर पाणी उडते, चिखलमय रस्त्यावरून चालताना पाय घसरून अपघात होत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडावे की नाही, अशी भयावह परिस्थिती झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता विक्रम लहाने म्हणाले की, पावसामुळे सर्वत्र खड्डेमय रस्ते झाले आहेत. त्याची दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात आले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *